Home / अर्थ / अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी १७६ कोटी
mantralay_defult_thumb

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी १७६ कोटी

मुंबई (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी १७६ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा तसेच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी तातडीने सादर करण्याचा निर्णय राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी घेतला.
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, महिला आणि बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजीव कुमार आदी या बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे बालकांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य रक्षण, आहार पुरवठा, कुपोषण मुक्ती, गरोदर महिलांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन अपुरे असून त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित आहे. ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचा महिला आणि बालविकास विभाग सकारात्मक असून तसा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी देण्यात यावी. याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीत दिली जाणारी भाऊबीज भेटही नियमीतपणे देणे आवश्यक आहे, असे पंकजा मुंडे यांनी या बैठकीत सांगितले. त्यावर, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे आवश्यक असून त्यासाठीच्या १७६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे वित्तमंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले. वित्त विभागाने हा प्रस्ताव तातडीने प्रस्तावित करुन त्यास आवश्यक त्या सर्व मंजुऱ्या घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यापुढील कालावधीत दिवाळीतील भाऊबीज भेट नियमीतपणे दिली जाईल, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वित्त विभागाच्या मंजुरीसह इतर आवश्यक त्या सर्व मंजुऱ्या तातडीने घेऊन येत्या महिला दिनापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महिला दिनी मानधनधन वाढीची भेट दिली जाईल, असे मुंडे यांनी या बैठकीनंतर सांगितले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *