Home / अर्थ / ऑगस्टपासून महाराष्ट्र एल.बी.टी. मुक्त
mantralay_defult_thumb

ऑगस्टपासून महाराष्ट्र एल.बी.टी. मुक्त

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात सुरू असलेला स्थानिक संस्था कर म्हणजेच एल.बी.टी. येत्या एक ऑगस्टपासून रद्द करण्याची घोषणा करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी 3757 कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पात 643 कोटी रुपयांचे नवे कर सुचवले असून एल.बी.टी. रद्द् केल्यानंतर राज्यातील मुंबई व्यतिरिक्त इतर महापालिकांना 6875 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी किरमिजी जाकीट घालून दुपारी एक वाजून पंचावन्न वाजता सभागृहात प्रवेश केला तेंव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. ठीक दोन वाजता अर्थसंकल्पाचे वाचन सुरु केले. छापील भाषण ते मध्ये मध्ये बाजूला ठेवत होते. सर्व बाजूच्या सदस्यांशी संवाद साधत ते भाषण करीत होते. त्यामुळे जवळजवळ पावणे दोन तास त्यांचे भाषण सुरु होते. त्यांच्या भाषणात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य काही प्रमाणात व्यत्यय आणत होते. मात्र, वातावरण शेवटपर्यंत खेळीमेळीचेच राहिले. मुनगंटीवार यांनी निधीच्या तरतुदी करण्यासाठी चिन्हांकित ( मार्क्ड फंडस्) असा शब्द वारंवार वापरला तेव्हा छगन भुजबळ उठून म्हणाले की, हे चिन्हांकित काय आहे? तेव्हा हजरजबाबी मुनगंटीवार म्हणाले की, हे चिन्हांकित आहे, तुमच्यासारखे प्रश्नांकित नाही. भाषणाच्या उत्तरार्धात मुनगंटीवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकांचा उल्लेख केला तेव्हा विरोधकांनी हे चिन्हांकित की प्रश्नांकित आहे, असे विचारले. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले की, हे आदेशांकित आहे आणि उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावे मुंबई विद्यापीठात अध्यासनाची स्थापना करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद आहे. ठाकरेंचे स्मारक मुंबईत तर गोपीनाथ मुंडेंचे स्मारक औरंगाबाद येथे करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. भाजपाच्या एकेकाळच्या पाच ज्येष्ठ नेत्यांच्या नावे पाच योजनांची घोषणा अंदाजपत्रकाता असून मोतीरामजी लहाने यांच्या नावे कृषी संमृद्धी योजना, प्रमोद महाजनांच्या नावे कौशल्य विकास योजना, घरकुलांसाठी जागा खरेदी करण्यासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे योजना, उत्तमराव पाटील वन उद्यान आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास अशा पाच योजनांची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

गतवर्षीची राज्य योजना 51 हजार 222 कोटी रुपयांची होती. मात्र, त्यातील सर्व पैसा योजनांसाठी उपलब्ध झाला नव्हता. हे लक्षात घेऊन यंदाच्या 54 हजार 999 कोटी रुपयांच्या वार्षिक योजनांसाठी सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यात कपात केली जाणार नाही अशी घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. शेतक-यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी जलयुक्त शिवार ही योजना आपण मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून घेतलेली 173 कोटी रुपयांची कर्जे व व्याज माफ करून दोन लाख 23 हजार शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा संकल्प आपण केला आहे. गारपीटीतून द्राक्षांचे पीक वाचविण्यासाठी विशेष प्रकारचे नेटशेड शेतकऱ्यांना घेता यावे यासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना अर्थसंकल्पात प्रस्तावित कऱण्यात आली आहे.

वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी जे मार्ग उभे केले त्यात सर्व प्रकारच्या वाढीव चटईक्षेत्र निर्देशकांसाठी जादा रक्कम महापालिकांकडून वसूल केली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात 0.33 ऐवजी .60 इतकी वाढ करण्यात येत असून त्यासाठी जादा रक्कम घेण्यात येईल. देशी मद्यावरील कररचनेत बदल करून प्रूफ लीटरवर 120 रुपये अथवा निर्मिती मूल्याच्या 200 टक्के असा कर लावणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते योजना तसेच आमदार गाव दत्तक योजना अशा दोन योजनाही त्यांनी घोषित केल्या आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा वाढवणे व नवे रस्ते तयार करणे यासाठी नव्याने मुख्यमंत्री रस्ते योजना सुरु करण्यात येत असून त्यासाठी 350 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. यातील प्रगती पाहून हा निधी एक हजार कोटींपर्यंत वाढवला जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय जिल्हा नियोजन व विकास मंडळांमार्फत ग्रामीण रस्त्यांसाठी असणारा 1413 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहेच असेही ते म्हणाले.

केंद्र सरकराने सुरु केलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद लाभला आहे. सुप्रिया सुळे, स्वतः शरद पवार यांनीही गावे दत्तक घेतली. त्यामुळे आपण आमदार आदर्श ग्राम योजना सुरु करीत असून त्या अंतर्गत सर्व पक्षांचे आमदार आपापल्या मतदारसंघातील एक एक गाव यासाठी निवडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेतून पुढील पाच वर्षात एक हजार गावे विकसित होऊ शकतील असेही ते म्हणाले.
नाशिक येथे 2015-16 वर्षात सुरु होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी गोदावरीवर घाट बांधणे, पोहोच रस्ते, तात्पुरती निवासस्थाने आदिंसाठी 2378 कोटी 73 लाख रुपयांची तरतूद करण्यता आली असून विविध तीर्थक्षेत्रांसाठी 125 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. या योजनेत मुंबईतील हाजी अली, नागपूरचा ताजुद्दीन दर्गा, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, भीमाशंकर व घृष्णेश्वर ही पाच ज्योतीर्लिंगे, कोल्हापुरातील महालक्ष्मी आदि तीर्थस्थानांचा विकास संकल्पित आहे. नागपूरजवळ कामठी येथील ड्रॅगन पॅलेस पॅगोडाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपये ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीसाठी या वर्षात 109 कोटी रुपायंची तरतूद करण्यात आली असून केंद्राप्रमाणे स्मार्ट सिटीसाठी वेगळी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी 268 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. एक ऑगस्ट 2015 पासून एल.बी.टी. रद्द करण्यात आल्यानंतर मुंबई वगळून राज्यातील अन्य महानगरपालिकांना द्यावी लागणारी 6875 कोटी रुपयांची भरपाई मूल्यवर्धित कराचे दर वाढवून करावी लागणार आहे. अशा प्रकारच्या कर आकारणीत सध्या जे एल.बी.टी.चा भार सोसत नाहीत अशा महापालिका क्षेत्राबाहेरील जनतेवरही पडणार आहे. यात किमान करवाढच प्रस्तावित करण्यात आली आहे. याआधी मुंबई महापालिकेला भराव्या लागणाऱ्या क्रूड तेलावरील जकात करापोटी जो भार पडतो तो तेल कंपन्या राज्यातील अन्य भागात तेलाच्या वाढीव दरातून वसूल करतात, असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे. वाढीव कर दरामुळे वसूल होणारा महसुलाचा काही वाटा महापालिकांना तर काही त्याबाहेरील क्षेत्रांच्या अनुदानासाठी दिला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *