Home / आरोग्य / ग्रामीण बागापासून पळणाऱ्या डॉक्टरांवर आता बायोमेट्रीक हजेरीचा इलाज
mantralay_defult_thumb

ग्रामीण बागापासून पळणाऱ्या डॉक्टरांवर आता बायोमेट्रीक हजेरीचा इलाज

मुंबई (प्रतिनिधी)- आरोग्य केंद्राला दुर्लक्षित करून शहराच्या गावी राहत शासकीय वेतन खाणाऱ्या सरकारी डॉक्टरांना चाप लावण्यासाठी आरोग्य विभागाने आता आरोग्य केंद्रांत बायोमॅट्रीक हजेरी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या आरोग्य स्थितीसंदर्भातील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. अधिकच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयाकडे सरकारी डॉक्टरांनी रुग्ण पाठवले की त्यांचेही ऑडिट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयातील परिचारकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यांच्या विद्यावेतनात गेली १० वर्षे वाढ झालेली नव्हती. ती यंदा करण्यात येणार आहे. कुपोषणग्रस्त मेळघाटात जशी टेलीमेडीसीन योजना राबवण्यात येत आहे, त्याच धर्तीवर चार आदिवासी जिल्ह्यात टेलीमेडीसीन सेवा चालू करण्यात येणार असून डोंगरावर राहणाऱ्या रुग्णास मुंबईतल्या डॉक्टरांची ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवा पुरवण्यात रस्त्याअभावी जेथे अडचणी आहेत तेथे वॉटरबोट अ‍ॅम्बुलन्स पुरवण्यात येणार आहेत. नंदुरबार (सरदार सरोवर), अलिबाग ते गेटवे, महाबळेश्वर (तापोळा) आणि गडचिरोली (प्राणहिता नदी) येथे अशा बोट कार्यरत असतील. प्रत्यारोपणास उपलब्ध असलेले अवयव कमीतकमी वेळेत रूग्णालयास पोहोचवता यावे यासाठी महानगरांत ग्रीन कॉरीडॉर निर्माण करण्यात येणार आहे. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या रूग्णास उपचार देता यावेत यासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्सही तैनात करण्याची योजना असून १८ औषध उपकरणांनी सुसज्ज अशा बाईक अ‍ॅम्ब्युलन्स जुलैमध्ये मुंबईत धावू लागतील, अशी माहितीही सावंत यांनी दिली.
ज्येष्ठ रूग्णांना त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेवा देणारी योजना लवकरच चालू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने चार कॅन्सर रूग्णालये राज्याला मंजूर केली असून त्यातील दोन नागपूर येथे उभारण्यात येणार आहेत. राज्यात आयव्हीएफ सेंटर्सची संख्या वाढत असून तेथे गरीब महिलांचे शोषण होऊ नये म्हणून निश्चित अशी कार्यप्रणाली आखून देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांना दरपत्रक लावण्याची सक्ती करणारा कायदा लवकरच बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शासकीय रुग्णालयांना अधिक चांगल्या सेवा देता याव्यात यासाठी काही रुग्णालये सार्वजनिक खासगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर चालवण्यास देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात बेलियार या कंपनीकडे महाबळेश्वर व माथेरान येथील शासकीय रुग्णालये सोपवण्यात येणार आहेत. गर्भलिंग परिक्षणांतर्गत सर्वाधिक गुन्हे राज्यात नोंद झाले असून कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल शासकीय सेवेतील १५८ डॉक्टरांना निलंबीत केल्याची माहितीही सावंत यांनी दिली.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *