Home / ताज्या बातम्या / भाजयुमोच्या गणेश पांडे प्रकरणी इनकॅमेरा जबाब नोंदवा
mantralay_defult_thumb

भाजयुमोच्या गणेश पांडे प्रकरणी इनकॅमेरा जबाब नोंदवा

मुंबई (प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी मुंबई अध्यक्ष गणेश पांडे याने सहकारी महिला पदाधिकाऱ्याशी केलेल्या कथित गैरवर्तनाबाबत आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍यांकडून पिडीत महिलेचा इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात यावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.
या प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारपर्यंत सभागृहात निवेदन करावे, असेही त्यांनी सांगितले. या दरम्यान उडालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा-दहा मिनिटांसाठी तीन वेळा तहकूब करण्यात आले.
भाजयुमोचे तेव्हाचे मुंबईचे अध्यक्ष असणार्‍या गणेश पांडे याने मथुरा येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना सहकारी महिला पदाधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. याबाबत तक्रार केल्यावरसुद्धा पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याबाबत काँग्रेसच्या दिप्ती चवधरी यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. सभापती निंबाळकर यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना नाकारण्यात येत असल्याचे स्पष्ट करत विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन मिनिटे बोलण्याची संधी त्यांना दिली.
यावेळी बोलताना चवधरी यांनी सहकारी महिलेवर अत्याचार करणार्‍या पांडेला फक्त पक्षातून काढून टाकण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देणार्‍या पक्षातच महिला सुरक्षित राहत नसतील तर राज्यातील महिलांची सरकार काय सुरक्षा करणार असा प्रश्‍न करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांनी सदर महिलेला फेसबुकवर अश्‍लिल मेसेज पाठविण्यात येत आहेत. पक्षाकडे देण्यात आलेले पत्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले असून त्यात तिची नाहक बदनामी होत आहे. याबाबत पोलिसांनी इन कॅमेरा चौकशी करून सदर महिलेची तक्रार करायची इच्छा असल्यास ती नोंदवून कारवाई करावी, अशी सूचना केली. सहकारी महिलेवर अत्याचार करणार्‍या पांडे याने सदर महिलेला मराठण, असे हिणवून महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन गणेश पांडे याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी केली. सभापती निंबाळकर यांनी, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने सखोल चौकशी करून निवेदन करण्याचे निर्देश दिले. त्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य पांडे याला तत्काळ अटक करा, मुख्यमंत्र्यांना सभागृहात बोलावून शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगा अशी मागणी करत वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *