Home / ताज्या बातम्या / मुंबई महानगरपालिका बरखास्त करा
mantralay_defult_thumb

मुंबई महानगरपालिका बरखास्त करा

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराबाबत होत असलेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता या आरोपांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि या चौकशीसाठी मुंबई महानगरपालिका ताबडतोब बरखास्त करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केली.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही पाठविले आहे. या पत्रात निरूपम म्हणतात की, मुंबई महानगरपालिकेत गेल्या २० वर्षांपासून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची सत्ता असून महापालिकेतील भ्रष्टाचार विकोपाला पोहचला आहे. सत्तारूढ भाजपा आणि शिवसेना यामध्ये रोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तुमच्या पक्षाच्या खासदार किरीट सोमय्याने आरोप केले आहेत की, मुंबई महानगरपालिकेत माफिया राज सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला बांद्र्याचा ‘साहेब’ व त्यांचा मेव्हणा तसेच त्यांचाच खाजगी सचिव जबाबदार आहे. असे असूनही या संपूर्ण भ्रष्टाचाराची कसून चौकशी होत नाही. नालेसफाई घोटाळ्यातील कंत्राटदार तसेच काळ्या यादीतले कंत्राटदार कोर्टात जाऊन आदेश घेऊन पुन्हा कामे मिळवतात. रस्ते घोटाळ्यातील आरोपी कंत्राटदाराना पुन्हा पुन्हा कामे दिली जातात. नालेसफाई व रस्ते या दोन्ही विभागात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालेला असूनही त्याची चौकशी निष्पक्षपणे होत नाही.

देवनार डम्पिंग ग्राउंड घोटाळ्याला कोण जबाबदार आहे, हे कोणालाच माहित नाही. जकात व कोस्टल रोड मध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. मुंबईकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही आहे. मुंबईच्या रस्त्यांची वाट लागली आहे. मुंबईतील शाळांची व हॉस्पिटलची दयनीय अवस्था आहे. मुंबईकर महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. परंतु गरीब जनतेला दुसरा पर्याय नाही, म्हणून त्यांना नाईलाजाने जावे लागते. टॅबलेट घोटाळा तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. टॅबलेट विद्यार्थ्यांना दिला, पण महापालिकेच्या शाळांमध्ये इंटरनेटच नाही. विद्यार्थी त्याचा दुरूपयोग करत आहेत. महानगरपालिकेचा विकास आराखडा तयार झालेला आहे, तो फक्त बिल्डरांचा फायदा करण्यासाठीच आहे आणि त्यामध्येही हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेते मंडळी महानगरपालिकेत बसून गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील सर्वसामान्यांसाठी असलेले मोकळे भूखंड काबीज करून बसलेले आहेत. या सत्तारूढ नेत्यांच्या विरोधात मनपा कारवाई करत नाही. गेल्या १६ वर्षांपासून मनपातील सत्तारूढ मुंबईतील कचरा व्यवस्थापनाची नीट व्यवस्था करू शकलेले नाहीत. उलट कचरा व्यवस्थापनामध्ये ही आता एक मोठा भ्रष्टाचार उघड होत आहे.
मुंबई महानगरपालिकेची व्यवस्था संपूर्णतः कोलमडलेली आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा विश्वास नाही. सत्तारूढ दोन्ही पक्ष एकमेकांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत आणि या सर्व परिस्थितीचा मुंबईकरांना कंटाळा आला आहे. मुंबईत प्रदूषण आणि रोगराई प्रचंड वाढली आहे. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना मनपा मार्फत राबविण्यात आलेल्या नाहीत.

या सर्व परीस्थितीवर एकच पर्याय दिसतो आहे कि, महापालिकेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. किरीट सोमय्यांनी जे वक्तव्य केले त्या साहेबाचे व त्यांच्या नातेवाईकांचे नावे उघड केली पाहिजेत. जर ते प्राथमिक दृष्ट्या या भ्रष्टाचारात दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई केली पाहिजे. अशा परीस्थितीत महानगरपालिका काम करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने आपण मुंबई महानगरपालिका ताबडतोब बरखास्त करा आणि मनपामधील सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबई हायकोर्टचे वर्तमान किंवा माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *