Home / ताज्या बातम्या / सुप्रिया सुळे यांचा गुरूवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर
mantralay_defult_thumb

सुप्रिया सुळे यांचा गुरूवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार असून या दौऱ्यात त्या दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
यादरम्यान सुप्रिया सुळे औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, यशस्विनी सामाजिक अभियान या संस्थांच्या वतीने लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळावा याकरिता अनेक उपक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. यातील काही उपक्रमांची त्या पाहणी करतील व काही उपक्रमांची सुरुवातही करणार आहेत.
गुरुवार, दि. २१ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता त्या औरंगाबाद येथील हारून मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रोटी आणि कपडा बँक येथे भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेनऊ वा. पाचोड, ता. पैठण येथे ग्रामविकास संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट देऊन त्या कामाची पाहणी करणार आहेत. यानंतर समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर येथे दिवंगत माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. दुपारी बारा वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आमदार अमरसिंह पंडित यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना भेट देऊन पाहणी करतील तसेच उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील. दुपारी दोन वा. बीड नगरपालिकेच्या वतीने उभ्या करण्यात येत असलेल्या निराधार निवारा गृहाचे त्या भूमिपूजन करतील. यानंतर दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी भवन, बीड येथे त्या पत्रकारांसमवेत संवाद साधतील. सायंकाळी साडेचार वाजता बीड – अंबाजोगाई रस्त्यावरील चारा छावण्यांना भेट देत शेतकऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी सहा वाजता अंबाजोगाई येथील विहीर पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट देऊन यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वतीने आयोजित दुष्काळग्रस्त एकल महिलांच्या सहाय्यता कार्यशाळेला उपस्थित राहतील.
शुक्रवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे मानवलोक संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या होळना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट देतील. त्यानंतर कुंभेफळ येथील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट देतील. त्यानंतर लातूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या परिसरास भेट देऊन पाहणी करतील. सकाळी दहा वाजता कन्हेरवाडी या उस्मानाबाद जिल्ह्यातील आधुनिक आदर्श ग्रामला भेट देतील. दुपारी बारा वाजता शिरढोण ता. कळंब येथील लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण प्रकल्पास खासदार सुळे भेट देतील. यानंतर नायगाव/पाडूळी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास भेट देतील. वाटवडा येथे जनावरांच्या चारा छावण्यांना भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील. दुपारी चार वाजता लातूर येथील रेल्वे – टँकर पाईप लाईन प्रकल्पास भेट देतील. त्यानंतर त्या लातूर शहरातील विविध ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधतील. सायं सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांच्यासमवेत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

About admin

Check Also

Babanrao-Lonikar

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *